Thursday, April 24, 2008

कविता कशी सुचते..??

कवीता काय अशीही सुचते .........
.......... कवीता काय तशीही सुचते
.

कधी ती बाळकडु पाजते
कधी ती व्यासंगात बोलते
कधी ती प्रेमात गुंतते रंगते
कधी ती अध्यात्म साधते
कल्पनेच्या बैठकीवर भावनांची मांडणी असते
कवीता काय अशीही सुचते .........
.......... कवीता काय तशीही सुचते
.
कधी ती आई असते
कधी ती बाबा असते
कधी भाऊ तर कधी ताई असते
कधी ती नात्यांना सांधते
कधी ती अनामिकांना जोडते
कधी मित्र तर कधी मैत्रीण असते
कधी बायको तर कधी मेव्हणी असते
कधी स्वत:च्या तर कधी इतरांच्या मनातली मेख असते
कवीता काय अशीही सुचते .........
.......... कवीता काय तशीही सुचते
.
कधी ती आठवणींशी भांडते
कधी ती मुक्यानेच आक्रंदते
कधी ती माझ्यातल्या "मी" वर हसते
कधी ती माझ्या नसण्यावरही रडते
कवीता काय अशीही सुचते .........
.......... कवीता काय तशीही सुचते
.
कधी ती आत्मकेंद्रीत असते
कधी ती विश्वाला वेधते
कधी ती राखेतून जन्मते
कधी ती अनंतात लोपते
ना आदी ना अंत अशी ब्रम्हमय होते
कवीता काय अशीही सुचते .........
.......... कवीता काय तशीही सुचते
.
कधी ती थांबता थांबता वाढते

कधी ती वाढता वाढता संपते
कवीता काय अशीही सुचते......
....... कवीता काय तशीही सुचते

-----------------
मंदार हिंगणे

23/04/2008

No comments: