Wednesday, October 7, 2009

एकांत

कधी कधी
एकांत माझा गुणगुणायला लागतो..
त्या पाण्यावर पसरणार्‍या रेषांसारखा
अलिप्त.. शांत.. तरीही,
सरोवराच्या गर्भातली खळबळ सांगणार्‍या तरंगासारखा..
तुझ्या आठवांचा एक खडा टाकला..
की लगेच त्याचे साद पूर्ण सरोवरभर पसरणार..
तरंग थांबताच ....एक शांतता..शून्यात नेणारी.

अन मग पुन्हा एकवार एक आठवण
त्या पाण्यात जाऊन पडणार ......
मनाच्या सरोवरात खळबळ करणारी. .
कुठेतरी थांबवायचा हा खेळ
म्हणून मग मी उठून चालू लागतो..
पाऊल थकल्यावर जरा बसतो निवांत..
नेमकी तिथेच कुडीतील इंद्रिये कुरकुरायला लागतात

कारण,
तोच तरूचा पार असतो..
तीच असते दिवेलागण..
सारी सारी तिचीच देतात आठवण
आणि ओरडून सांगत असतात..
आज पौर्णिंमा..
तरी तुझा चंद्र आभाळी नाही ...

--
मंदार (साद मनाची)
१७-०९-२००९.

No comments: